Wednesday, December 24, 2008

सोबत..!!


जेव्हा वाटतं की..... तू असावस जवळ.. घटकाभर
आणि ओळखावास.. व्यथांनी भिजलेला माझा हळवा स्वर..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!

जेव्हा वाटतं की..... तू समजून घ्यावस सारं काही..
जाणावस नजरेतूनच.. अव्यक्त शब्दांनाही..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!

जेव्हा वाटतं की..... तू ऐकावीस माझी कविता..
अगदी मुग्ध होऊन..
आणि करावस प्रतिभेला प्रेरीत.. मोकळी दाद देऊन..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!

जेव्हा वाटतं की..... तुझी उणीव अगदी असह्य होतेय..
क्षण न क्षण सुना भासतो..
नेमकं तेव्हाच .. जे जे वाटतं ते ते सारं शब्दरूप होतं..
कवितेतून..
मन हलकं होतं.. व्यथा बोलक्या होतात..
जाणीवांना जाग येते..
नव्हे.. जाणीवांची जाणीव होते..
पण तरीही मन खंतावतच...
कारण..
नेमका तेव्हाच तू नसतोस सोबत..!!

Thursday, December 18, 2008

" उंबरठा...!!!"


स्त्री तर केव्हाच उंबरठ्याबाहेर पडलीय..
आत्ताची career woman तारेवरची कसरत करत संसार सांभाळते.. आणि
कधी कधी अपेक्षाभंग झाला की.. तितक्याच सहजतेने काडीमोड.. हा पर्याय ही स्वीकारते..!
Divorce हा शब्दं कित्ती सर्रास उच्चारला जातो ना आजच्या पिढीकडून.. असं जर कुण्या बुजुर्गांनी म्हटलं.. तर काय चुकलं..!
उंबरठ्याच्या आतली मर्यादा.. आणि बाहेरच्या विश्वाचा खरा ताळमेळ जिला साधता आला.. ती खरी "स्त्री"...!!
सध्या TV वरच्या किरन बेदींच्या "आप की कचहरी" या मालिकेला बघताना सुचलं ते हे दीर्घकाव्य..!! या सद्यस्थिती वर सल्ला देणारं भाष्य करण्याचा.. अननुभवी व्यक्तीचा हा प्रयत्न.. थोडासा लांबलेला.. पण सुसह्य ठरावा.. हीच आशा..

" उंबरठा...!!!"

अजूनही उंबरठ्याशी घुटमळतायत.. माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा..
सांगतायत मला .. घे माघार.. नको हा प्रयत्न केविलवाणा..!

वृंदावनात उभी तुळस.. सांगत होती मागे सर..
तुला हवय .. तस्संच घडेल.. फक्त थोडा धीर धर..

घरट्यामधल्या पिल्लांसाठी चिमणचारा कोण देईल..?
पंखांमध्ये बळ कुठेय.. कणखर बाणा कसा होईल..??

काडी काडी जमवलेल्या.. घरट्यामध्ये घरपण नाही..?
विश्वासाच्या भक्कम भिंती.. वात्सल्याचं अंगण नाही..?

ऐक माझं .. विचार कर.. पिल्लांसाठी मागे सर...
अस्तित्वाची आशा नको.. कर्तव्याची कास धर..!!

मोडायचाच होता डाव.. तर मांडला तरी कशासाठी..?
तोडायचे सारे बंध.. तुटपुंज्या यशापाठी..?

पटतय का तुला तरी..तुझे विचार.. तुझं वागणं..
जबाबदारी टाळून असं.. अस्तित्वाशी लढत जगणं..?

त्याला तू कळलीच नाहीस.. ही त्याची हार आहे..
पण जिंकण्याचा हट्ट म्हणजे.. व्यर्थ अविचार आहे..

म्हणून म्हणते ऐक माझं.. वळ मागे.. सांभाळ घर..
जप नातं जाणीवांचं.. पुन्हा एकदा विचार कर..!!

उंबरठ्याच्या आत असेल.. भावनांचा कोंडमारा..
पण.. विस्कटलेल्या जगापेक्षा.. नक्कीच बरा तो पसारा..

बंधन म्हणून पाहीलस तर.. स्वातंत्र्याचा प्रश्न उठेल..
मर्यादेची जाणीव जप.. सगळं कोडं सहज सुटेल..!!

जग चार भिंतींमधलं.. समाधानात तोलून बघ..
कुठेतरी तडजोड असेल.. तेही घाव झेलून बघ..

तोडणं खूप सोपं असतं.. जोडणं अवघड करून नकोस..
जाणीवपूर्वक नातं जप.. व्यवहार मनात धरू नकोस..

काही गणितं चुकत जातात.. बाकी काहीच उरत नाही..
हातचे कितीही धरले तरी... झोळी फाटकी भरत नाही..

म्हणून फक्त लक्षात ठेव.. "काडीमोड" करू नकोस..
जगण्याच्या या स्पर्धेमधून.. माघारी तू फिरू नकोस..!!!

Monday, December 15, 2008

शहाणा विचार..


नको गुंतुस गं वेडे..
जीव लावून जीवाला..
सार्‍या आशा- आकांक्षांचा..
स्वैर सोडून हवाला..

भावभावनांचे धागे..
तुझ्या आर्जवांच्या मागे..
गेले विणत विणत..
मुक्या मायेचा जिव्हाळा..

जिथं आभाळंही थिटे..
असे शब्द शब्द खोटे..
सांग कशाला जपावा..
अशा नात्याचा उमाळा ..

तुझ्या आसवांचे मोल..
ज्याला कळलेच नाही..
अशा पाषाण हृदयी..
केला अभिषेक ओला..

हुरहुर कुणासाठी..
ज्याला झुरण्याचा शाप..
अगतिक जाणीवांचा..
जिथे उहापोह झाला..

एक शहाणा विचार..
कर आता तरी वेडे..
व्यवहार भावनांचा..
कुणी स्वार्थासाठी केला..

आता विसर विसर..
झाले गेले सारे जुने..
उणे नव्हतेच काही..
असा देऊन हवाला..!!

Friday, December 12, 2008

THANKS..!!


आज मी खर्‍या अर्थाने शहाणी झाले...
आणि तुझ्यापासून पूर्णतः वेगळी..
आता कुठलेच किंतु परंतु नाहीत..
गाढ निद्रेतून ..
नव्हे .. पोकळ स्वप्नातून जागी झाले..
THANKS..
मला जागवल्याबद्दल... !!

काही आभास आयुष्याला तेजाचं वलय देतात..
काही आवाज .. भविष्याला.. पंखांचं बळ देतात..
तुझा आवाज.. आणि तुझं अस्तित्व ..
दोन्ही अनाकलनीय होतं..
नव्हे . क्षणभंगुर होतं..
THANKS..
आज ते जाणवल्याबद्दल.. !!

जशा आठवणी शाश्वत असतात..
तसेच आघातही बोथट होत जातात..
शंभर खुलासे.. आणि दोन चार दिलासे..
इतकाच असतो आपला प्रवास..
THANKS..
आज तोही संपवल्याबद्दल.. !!

आजची "मी" .. आणि कालची "मी"..
यात फरक इतकाच आहे की..
कालचे "आपण".. आज "आपण" राहीलो नाही..
आपापल्या वाटेवर.. आपापल्या विश्वात..
स्वतःपासून पूर्णतः वेगळे होऊन सुद्धा..
परिपूर्ण असल्याचा सा़क्षात्कार घडवून देतात..
ते आपले विचार..
ती आपली कृती..
आणि..
तो आपला 'नकार' ...
THANKS..
तो उच्चारल्याबद्दल... !!!

Saturday, June 14, 2008

जगणे इतुके अशक्य का रे ?..


जाणून सुद्धा अगम्य सारे..
जगणे इतुके अशक्य का रे ?..

उलगडणारे साधे कोडे..
अवघड होते आणिक थोडे..
कधी सुटावे सहजासहजी..
अतर्क्य क्लुप्त्या.. गूढ इशारे..
जगणे इतुके अशक्य का रे ?..

वाळूवरती चार अक्षरे..
जरी रेखीली नव्या दमाने..
पूसून जाती लाटा काहीच..
घडले नव्हते अशाप्रमाणे..
लिहून देखील सबंध कोरे..
जगणे इतुके अशक्य का रे ?..

कुणी स्वतःहून साद घालते..
कुणी पाहूनी वाट बदलते..
अवतीभवती वावरणारे..
तेच खरे का.. सगेसोयरे..?
जगणे इतुके अशक्य का रे ?..

असाध्य नसते कधीच काही..
जगणे सुद्धा अशक्य नाही..
कधी तपस्या...किंचित संयम..
अन जिद्दीच्या नित्य आधारे..
जगणे व्हावे सुसह्य सारे..!!!

Thursday, June 12, 2008

तेरे बिना जिंदगीसे कोई...


तेरे बिना जिंदगीसे कोई..शिकवा तो नही..
तेरे बिना जिंदगीभी लेकिन्..जिंदगी तो नही..

काश ऐसा हो.. तेरे कदमोंसे चुन के मंजील चले..
और कही.. दूर कही..
तुम गर साथ हो.. मंजिलोंकी कमी तो नही..

जी मे आता है.. तेरे दामन मे.. सर झुका के हम..
रोते रहे.. रोते रहे..
तेरे भी आंखोमे आसूओंकी नमी तो नही..

तुम जो कह दो तो.. आज की रात..
चांद डूबेगा नही.. रात को रोक लो..
रात की बात है.. और जिंदगी बाकी तो नही..!!

या गीताचा मराठी अनुवाद करण्याचा...एक प्रयत्न...

"तुझ्यविना.."

तू नसल्याची... आयुष्याशी
तक्रार अशी केली नाही..
तू नसताना मज जगण्याची..
इच्छाच मुळी झाली नाही..

वाटले कधी .. वाटेत तुझ्या..
पावलोपावली तुझ्या सवे..
पाऊलवाटेस निवडण्याची..
संधीच दूर गेली नाही..

मनसोक्त तुझ्या पदराखाली..
मी रडून घ्यावे मुक्तपणे..
पण.. तुझ्याच नेत्री अश्रूंना..
सर थांबवता आली नाही..

तव शब्दाखातर चंद्राने..
अस्ताला द्यावा नकार गं..
रात्रीला सुद्धा थांबवण्याचा,,
या नजरेचा विचार गं..
केवळ रात्रीचा प्रश्न सखे..
आणिक बाकी उरली नाही..!!!

Monday, June 9, 2008

हात...


जरी इंद्रीयांमुळे मनाला..
कसे जगावे कळे..
तरी जीवना अर्थ लाभतो..
केवळ हातांमुळे..

पाठीवरती कौतुकाची थाप
हातांनी द्यावी..
विश्वासाची ऊब ..
हाताच्या स्पर्शातून मिळावी..

प्राजक्ताची फुले ओंजळीत..
भरूनी काठोकाठ..
दातृत्वाचे पुण्य घडावे..
हाताच्या बोटांत..

घाम गाळूनी हात राबती..
संसाराचा ध्यास..
या हातांतील रेषांमध्ये..
प्रारब्धाचा वास..

कलासक्त हातांनी द्यावा
आयुष्यास आकार..
या हातांची साथ जन्मभर..
स्वप्नांना साकार..!!

Friday, June 6, 2008

ठराव..


शून्यात विश्व बघण्याचा..
मज सराव झाला आहे..
माझाच सखे माझ्याशी..
हा ठराव झाला आहे...

एकटाच आलो होतो..
एकटा निघालो आहे..
क्षणभर मागे बघण्याचा..
हा पडाव आला आहे..

कित्येक मुखवटे खोटे..
ओढले चेहर्‍यावरती..
मी ओळखले ना मजला..
इतुका बनाव झाला आहे..

जन्मलो जिथे होतो मी..
तो गाव राहीला मागे..
मातीचा मजवर तिथल्या..
हा प्रभाव झाला आहे..

मी अजून संस्कारांचे..
गिरवीत धडे बसलो गं..
माणसात माणुसकीचा..
जरी अभाव झाला आहे..

व्यवहार भावनांचे मी..
समजूच कधी शकलो ना..
तत्वात सत्व जपण्याचा..
मज सराव झाला आहे..

माझाच सखे माझ्याशी..
हा ठराव झाला आहे...
मातीचा मजवर तिथल्या..
हा प्रभाव झाला आहे..
मी ओळखले ना मजला..
इतुका बनाव झाला आहे..!!

कभी कभी..


एक अधुरापनसा जिंदगीमे
मेहसूस होता है कभी कभी..
सबकुछ है साथ.. फिर भी
एक कमी सी लगती है कभी कभी..

खुशियोंका आंगन है..
अरमानोंका सागर है..
फिर भी..
किसी गम की लहर से आंखोमे..
नमी सी लगती है कभी कभी..!

खैर.. कुछ लम्हे थे..
जिन्हे भुलना नामुमकीन है..
दिल के कोने मे.. यादोंकी मेहफिल..
जमी सी लगती है कभी कभी..

कोशीश तो जारी है..
उम्मीद के संग चलने की..
फिर भी.. किसी मोड पर जिंदगी..
थमी सी लगती है कभी कभी..!!!

पहीला..वहीला.. "पाऊस"


आठवणींच्या अल्लड सरी झेलत..
माझं पहील्या पावसात भिजणं..
आसुसलेल्या अवखळ थेंबांचं..
माझ्या मूठभर अंगणात रुजणं..

सारं कसं नवखं..
पहिलं वहीलं भासणारं..
ओल्याचिंबं देहावरची..
जुनी मरगळ पुसणारं..

ओंजळभर नवे मोती..
अंगणभर नवा सुवास..
पसाभर उत्साहाने..
जगण्याचा नवा प्रयास..

म्हणून तुझी वाट पाहात..
वर्षभर झुरायचं..
अन तू आलास... की अलगद..
तुझ्या कुशीमध्ये शिरायचं..

चिंब चिंब भिजायचं..
धुंद होऊन लुटायचं..
शुभ्र दुधी झरा होत..
खडकामधून फुटायचं..

झिम्माड गाणी.. उनाड पाणी..
पहील्या पावसात बघायचं..
तृप्त क्षण मनात जपत..
पाऊस होऊन जगायचं..!!

कभी तो...


कभी तो दिल की धडकन पर भी थोडा गौर करलो..
जो आसू गीर पडे है उनको गिनके आह भरलो..

जो बेहतर समझोगे तुम.. वैसे पेश आना न हमसे..
कभी तो मेरे जजबातोंके जरीये राह चल दो..

था मेरा वासता तेरे कदम हर मंजिलोंसे..
कभी तो रासतेमे रुक के..मेरी राह तक लो..

मैं हुं उम्मीदका नगमा... वह सच्चाई खुदा की..
वफांओंका घना साया.. जिसकी परवाह करलो..

चलो छोडो मुनासिफ यह नही.. बस एक ख्वाहीश..
मेरे अरमानोंके खातीर तो यह गुनाह कर लो..

जला कर राख ना हो पाये ..वह यादे पुरानी..
उन्हीके साथ जो रिश्ता है बस .. तबाह करलो..!!!

Monday, May 12, 2008

मीच माझा..


डोळे सताड उघडे..
आणि नजर एकटक छताकडे..
सभोवताली किर्र्..काळोख..
पण माझा रोख मात्र स्वतःकडे..

आठवणींचा लख्ख प्रकाश..
डोळे घट्ट मिटल्यावरही दिसणारा..
खिडकीभर जुनच आकाश..
पण आज रंग .. नवखा भासणारा..

काल तिथं तू होतीस..
टिपूर चंद्राच्या चांदण्यात..
आणि मी सुद्धा रात्रभर..
आतुर.. शब्दांना मांडण्यात..

आता फक्त मीच आहे ..
एकटा बंदिस्त खोलीत..
आयुष्यही एकसूरीच..
चाललय त्याच त्या चालीत..

म्हटलं तर मीच माझा..
फक्त तुझाच असणारा..
आणि तू कुणा दुसर्‍याचीच..?
या कल्पनेनेही खचणारा..

आता फक्त स्वतःपुरतीच
चौकट आखून घेतली आहे..
त्याचे चारही कोपरे माझे होतील
अशी भिंत घातली आहे..

त्या भिंतीपलीकडचं जग आता..
उगाच नकोसं वाटतं..
अन.. खिडकीबाहेर पाहीलं तरी..
जुनच मळभ दाटतं..

म्हणुन लक्ष केंद्रीत केलय..
'मी' फक्त माझ्यावर..
आणि विनाकारण जपलेल्या..
त्या अपेक्षांच्या ओझ्यावर..

तेच फक्त दूर केलं की.
सगळं मळभ आपोआप सरेल..
अन माझ्या गरुडझेपेसाठी..
तेच खरं आभाळ ठरेल..

मग.. चल मित्रा .. घे झेप..
फक्त तिला वजा कर..
अनुभवातलं शहाणपण जपत..
आयुष्यभर मजा कर !!!!!!

Friday, May 9, 2008

स्पर्श..



नुकताच आसवांना.. बिलगून स्पर्श गेला..
हळुवार हुंदक्यांना..रडवून स्पर्श गेला..

अनभिज्ञ .. तृप्त गात्री.. रोमांच वेचताना..
अस्थिर स्पंदनांना.. अडवून स्पर्श गेला..

अलगुज भावनांचे .. शब्दात मांडताना..
कवितेत शिल्प माझे.. घडवून स्पर्श गेला..

भावार्थ आर्जवांचा.. समजून सांगताना..
कित्येक गूढ गोष्टी .. पढवून स्पर्श गेला..

अनमोल त्या क्षणांना.. हृदयात शोधताना..
नक्षत्र अंतरंगी.. जडवून स्पर्श गेला..!!!

विधीलिखित


अक्षम्य चुका टाळता आल्या असत्या तर..
किती बरं झालं असतं..
तुला भेटणंच मी सर्वात आधी टाळलं असतं !
मग....
सगळे संदर्भ आपोआपच टळले असते.
छे..
पण असं ठरवल्या प्रमाणे घडतं का कधी..?
अगदी मोजून मापून... पाउल पडतं का कधी..?
नियतीच्या भेटीगाठी विधीलिखित असतात म्हणे..
म्हणूनच की काय..
आयुष्यात फक्त लिहिता येतं..
पुसता नाही.. !!!

Sunday, February 3, 2008

ध्यास..


पूर्णतेचा ध्यास कायम असला तरी..
स्वप्नांच्या व्यथा अधुर्‍याच राहतात..
कक्षेच्या बाहेर अपेक्षा रुंदावतात..आणि
जीवनाच्या कथा अपुर्‍याच राहतात..

लिहायचं असतं खूप काही..
आयुष्य अधोरेखीत करेल असं..
पुसायचं नसतंच.. कधीच नाही..
रेखायचं चिरंतन ठरेल असं..

पण.. नव्याने डाव मांडता मांडता..
जुने ते घाव तसेच राहतात..
जिंकण्याचा हट्ट करता करता..
हरण्याचा सराव करुन पाहतात..!!!

माझं मन...


माझं मन मोकळं होतं..
फक्तं माझ्या मनाकडे..
तेच ऐकून घेतं माझे
शब्द भोळे भाबडे..

मनामधलं मनापासून
मनालाच सांगते मी..
विचारांचा अभिप्राय
मनाकडे मागते मी..

मग मन जरा गंभीर होतं..
विचार करु लागतं..
कधीतरीच वेडं मन
शहाण्यासारखं वागतं..

चंचल आहे अल्लड मन..
मला पक्क ठाऊक आहे..
माझ्यापेक्षा माझं मनच ..
हळवं आणि भावूक आहे..

मन सोबत आहे म्हणूनच
एकटेपणाला अर्थ आहे..
मनाशिवाय भावनेचं
जगणं सुद्धा व्यर्थ आहे !!!!

Friday, February 1, 2008

स्वप्नं ...


जागृत नयनी स्वप्नं पाहते..
स्वप्नांचा मज छंद..
उभ्या जीवनी कधी मिळेना..
पूर्तीचा आनंद..

स्वप्नंफुलातील मधुकण वेचे..
मनातला मकरंद..
या पुष्पातून ..त्या पुष्पावर..
स्वप्नकळ्यांचा गंध..

भ्रमरछंदी मन कधी न टिकले..
एका स्वप्नं फुलावर..
स्वप्नसडा जो विखरुन गेला..
हुंगण्यास तो अनावर..

त्या स्वप्नांची अवीट गोडी..
अलौकीक माधुरी..
पूर्णत्वातील स्वप्ने काही ..
काही स्वप्ने अधुरी..

जरी अधुरी जीर्ण पुराणी
तरी तराणे नवे..
उमेद इच्छा सबुरी..
आणिक आकांक्षांच्या सवे..

अपूर्णतेचा शोध लावण्या..
मी ही मिलिंद व्हावे..
लाभून तृप्ती स्वप्नपूर्तीची..
सौख्ये विलीन व्हावे..!!!

Monday, January 28, 2008

कशाला ???


विसरायाचे आहे सारे स्मरु कशाला.. ??
आठवणींच्या रिक्त पोकळ्या.. भरु कशाला ..??

घडून गेले बरेच ... तरीही घडते आहे...
गतकाळाच्या सुप्त सावल्या... धरु कशाला..??

कळले जेव्हा चुकले.. तेव्हा शहाणी झाले..
व्यर्थ चुकांचे हिशोब पुन्हा.. करु कशाला..??

स्वैर मनाचे विचार आता.. जाणीन म्हणते..
चाकोरीतील सक्त बंधने.. धरु कशाला..??

आता कुठेशी धडपडते..मी जगण्यासाठी..
घटका घटका श्वास मोजुनी.. मरु कशाला..??

Tuesday, January 22, 2008

प्रवास...


नव्हते सवे कुणीही ... एकांतवास होता..
मी चालले तरीही .. तोही प्रवास होता..

होतास सोबतीला होऊन सावली तू..
तेव्हा कुठे कळ्यांच्या गात्री सुवास होता..

आता फुले कळ्यांची आहेत ओंजळीशी..
पण गंध वेचणारा तो ''तू'' हवास होता..

गंधातला बिलोरी तो स्पर्श आज नाही...
साराच प्राक्तनाचा.. फसवा आभास होता...

काटेच आज माझ्या वाटेत सांडलेले..
व्हावा सराव त्यांचा इतुका प्रयास होता...!!!!!!!

Monday, January 21, 2008

'' तेव्हापासून......''


नव्हती जेव्हा तुझी नि माझी ओळख साधी..
संवादाची वृथा अपेक्षा प्रश्नाआधी..
तेव्हापासून खोल मनाच्या गाभार्‍याशी..
तुझ्या स्मृतींच्या सवे घ्यायची नित्य समाधी..

तेव्हापासून जडली बाधा आठवण्याची..
पुन्हा मनाला मागे मागे पाठवण्याची..
शब्दफुलांचे असंख्य झेले.. अनंत आशा..
मुठीत काही मिठीत थोडे साठवण्याची..

तेव्हापासून फ़ितुर झाले श्वास बिलंदर..
तेव्हापासून उरले नाही..दूरात अंतर..
शब्द लाघवी जुळले.. आणिक घडली कविता..
रुळू लागले ओठावरती..गीत परस्पर...

तू नजरेने सांग एकदा माझ्यासाठी
जुळतील का रे.. तुझ्या नि माझ्या रेशीमगाठी..
तुझेच व्हावे मीपण तेव्हा सर्वस्वाने..
विसरून माझे 'मी' पण अवघे तुझ्याच साठी..

असे घडावे तसे घडावे.. घडेल का रे?
माझ्यावाचून काही तुझेही अडेल का रे
तेव्हापासून त्या सरलेल्या.. क्षणाक्षणाला..
स्मरण्याचे हे वेड तुलाही जडेल का रे..??

काय खुळी मी विचारते बघ भलते सलते...
नाहीच काही तसे मलाही अचूक कळते..
उगीच वेड्या आशेवरती माझ्या नकळत..
अल्लड पाऊल पुन्हा पुन्हा त्या तिथेच वळते..

अपुल्यामधले किंतु परंतु सरतील जेव्हा..
जरतारीच्या रिक्त पोकळ्या भरतील तेव्हा..
उपचाराचे रूक्ष बोलणे सोड अन्यथा...
आठवणींचे हिशोब केवळ उरतील तेव्हा..

नकोच गुंता नात्यांचा ती व्यर्थ मुजोरी..
नकोस तोलू शब्दांमधले अर्थ दुहेरी..
मित्रत्वाची अवीट गोडी ओढ चिरंतन..
अखंड राहो पावित्र्याचा बंध रुपेरी..

तेव्हापासून असेच काही स्मरते.. झुरते..
नित्य उशाशी अश्रू.. आणिक मनात सल ते..
किती ठरवते विसरून सारे पुन्हा नव्याने..
जगण्याचा मी केविलवाणा प्रयत्न करते..

अखेर माझ्या नकळत मजला.. गुपित कळते..
शून्यामधल्या घरट्यासाठी वणवण फिरते..
तेव्हापासून... माझी प्रतिभा .... अलिप्त.... निश्चल..
म्हणून माझी कविता.. कायम अपूर्ण उरते............ !!!

'' ध्येयं ...''


ठरव एकदा शांतंपणे
जगण्यामागचा हेतू काय..
दिशाहीन भटकायचं..
जगण्यासाठी ध्येयाशिवाय..??

अस्तित्वाची जाणीव काय..
सावलीसुद्धा करुन देते..
पण अंधाराच्या खोल गर्तेत
अंधाराची होऊन जाते..

अशावेळी दिव्यासारखं
फक्त एकदा जळून बघ..
तुझं स्वत्वं नक्की मिळेल
मागे-पुढे वळून बघ..

कुणीच नसतं कुणाचं
आपली आपण चालत रहा..
कर्तृत्वाच्या बळावरती
संकटांना झेलत रहा..

ठेच लागेल जखम होईल
वेळेसरशी भरुन येईल..
व्रण मागे ठेवून जाईल
त्याचीसुद्धा सवय होईल..

स्वत्:वरती विश्वास ठेव
खंबीरपणे पाऊल टाक..
निर्णयाशी ठाम हो
वास्तवाचं भान राख..

स्पर्धा कर वार्‍याशी
प्रवाहात ये.. सोडून काठ..
जमिनीवरती पाय रोवून
आकाशाची उंची गाठ..

ध्येयासक्त आशावाद
जेव्हा इतका दृढ होईल..
तुझ्या नकळत तुझं ध्येयं
तुझ्यासमोर उभं राहील..

जाणीवांना श्रेयं मिळेल
उणीवांना मिळेल न्याय..
म्हणून म्हणते ठरव एकदा
जगण्यामागचा हेतू काय..

दिशाहीन भटकू नकोस
जगताना ध्येयाशिवाय.... !!!!

''हल्ली ...''


हल्ली तुझं माझ्याशी
पूर्वीसारखं पटत नाही..
खोल मनात दाटून येतं
पण.. शब्द ओठी फुटत नाही..

भेट होते स्तब्ध मुकी
भाव मात्र उमटत नाही..
तुझ्या गप्प राहण्यामागचं
कोडं काही सुटत नाही..

निसटलेल्या क्षणांमधलं
वादळ पुन्हा उठत नाही..
आठवणींची झुळुकसुद्धा
श्वासामध्ये भेटत नाही..

पुन्हा पुन्हा पारायणं
तरी पापणी मिटत नाही..
सरलं सारं.. कळतय तरी
वाट पाहून विटत नाही..

तुझं नक्षत्रांचं देणं
काही केल्या फिटत नाही..
निदान या जन्मीतरी..
फिटेल असं वाटत नाही...!!

'' पहिल्या पावसात भिजताना...''


जलधारांचे तुषार झेलित
सुगंधासवे सजताना..
मृदा पांघरे हिरवा शालू
पहिल्या पावसात भिजताना...

ग्रीष्म ऋतूचा दाह सोसूनी
रणरण उन्हात शिजताना..
कणकण वेचे सुखद शहारा
पहिल्या पावसात भिजताना...

बीज तृणातील इवले नाजूक
थेंब शोषूनी रुजताना..
अंकुर बदले रोप होऊनी
पहिल्या पावसात भिजताना...

चिमणपाखरे भिरभिरणारी
किलबिलचिव कुजबुजताना..
थवा विखुरला दहा दिशांना
पहिल्या पावसात भिजताना...

गतवर्षीचा पहिला पाऊस
मनात अलगद निजताना..
आठवणींना फुले पिसारा
पहिल्या पावसात भिजताना... !!!

'' रात्र... ''


हल्ली रात्र मला फार जवळची वाटते.. !!
अंधाराने व्यापलेली..
काळोखात कोंडलेली..
पण.. तरीही..
असंख्य नक्षत्रांनी वलयांकीत..
म्हणूनच कदाचित..' ती ' मला ' माझी ' वाटते.. !!
किणकिणणारी कांकणं..क्वचितच इवल्याशा धक्यानेही..
खळकन फुटतात..
अगदी तस्संच.. एखाद्या रात्री..
नि:शब्द वेगाने..एखादंच नक्षत्र..
पृथ्वीच्या ओढीने.. आकाशातून झेपावतं..
आणि.. मी मात्र.. त्याच्या साक्षीने का होईना..
खोल आंतर मनातली एखादि तरी सुप्त इच्छा..
मनातल्या मनात त्याला बोलून दाखवते..
माझं नशीब त्याच्यावर सोपवून..
मी निश्चिंतपणे झोपी जाते.. !
पण त्याचंही दुर्दैव असं..की..
ज्या ओढीने त्यानं हा अंत्:कालाचा तेज:पुंज प्रवास केला..
त्याचाही शेवट केवळ मातीत मिसळून व्हावा.. ??
मग..
माझ्यापेक्षा ते नक्षत्रंच मला जास्त कमनशीबी वाटू लागतं...
निदान तेव्हातरी....
माझ्याइतकं नशीबवान या जगात कुणीच नसतं !!!
म्हणूनच माझं रात्रीशी जरा जास्तंच पटतं..
माझ्या नशीबाचं पुन्हा पुन्हा कोडकौतुक करण्यासाठी का होईना...
त्या रात्रीची मी वाट पाहते..
कदाचित........
म्हणूनच......
हल्ली रात्र मला फार जवळची वाटते.. !!!

कुणासाठी..


कुणासाठी इतकीही वेडी होऊ नकोस
की त्याची सवय होईल..
त्याच्या शिवाय जीणं भकास
दिवस कसा उदास जाईल..

इतकीही वेडी होऊ नकोस की
स्वत्वासून दूर जाशील..
केवळ त्याचाच विचार करुन
स्वत्:पासून पोरकी होशील..

इतकीही वेडी होऊ नकोस की
अपेक्षांचं होईल ओझं..
वेळीच आवर सावर स्वत्:ला
उरलं सुरलं अवसान तुझं..

शहाणी हो.. विसर सारं..
गुंतू नक्कोस.. चुक्कून पण..
चुकांमधून शिक थोडं..
चिंतू नकोस वेडे क्षण..!!!

"उपाशी...."


सिग्न्नलपाशी गाडी थांबली,की...कित्येक चिमुरडे हात.. त्यांच्या त्या केविलवाण्या नजरा..जीवाच्या आकांताने पुढे सरसावतात.
इतरांचं माहित नाही, पण.. मी स्वत्: मात्रं त्या कोवळ्या जीवांसाठी काहीच करु शकत नाही, हि सल सारखी टोचत राहते.
माझी हतबलता मी माझ्या काव्यात व्यक्तं करण्याचा प्रयत्न्नं केलाय!


"उपाशी...."

माझ्या अपेक्षा..
अपेक्षांचे ओझे..
ओझ्याखाली दबलेले..
दिवास्वप्न्नं माझे....
स्वप्न्नातला वारा..
वार्‍यातला श्वास..
श्वासातला स्पर्श..
स्पर्शातली आस..
कोवळासा जीव..
शरीर निर्जीव..
डोळ्यातून माझ्या..
पाझरते कीव..
त्या दोन हातांत..
दयेची याचना..
नजर हताश..
मनी विवंचना..
अनाथ एकटा..
लाचार पोरका..
आपुलासा वाटे..
तो जीव परका..
त्याच्या मुखी घास..
मी भरवावा..
भुकेचा वणवा..
त्याचा शमवावा..
हात माझा जावा..
माझ्या ताटापाशी..
पुन्हा तो हताश........
होते मी स्वत्: उपाशी...!!!!

"अस्तित्वाचा लढा..."


झिजले होते, झिजते आहे..
कोरड्या मायेत रुजते आहे,
झिजून सरल्या आयुष्याचे..
उरले क्षण मोजते आहे..!!

सोसत होते, सोसते आहे..
लाचार नशीब पोसते आहे,
सोसून भरल्या डोळ्यान्मधले..
दुबळे अश्रू पुसते आहे..!!

लढले होते,लढते आहे..
अस्तित्वाशी भांडते आहे,
लढून पुन्हा जिंकण्यासाठी..
नवा डाव मांडते आहे..!!

" घरटे.."


आपुले घरटे सख्या ते चन्द्रमौळी..
पावसातून कालच्या वाहून गेले,

सांधण्याचा डावही फ़सवा निघाला..
भग्न्न त्या खाणाखुणा पाहून गेले,

आसवानी कोरडा आकांत केला..
गोठल्या रक्तात मी नाहून गेले,

घाव जखमांचे उराशी साचलेले..
गंजल्या वज्रापरि साहून गेले,

मीच माझे एकटीने सोसले जे..
ते तुला सांगायचे राहून गेले...!!!

'नातं '......


WHAT IS LOVE....???
COMPROMISE.....OR CONTINOUS ADJUSTMENT...!!!
GOD KNOWS......................
BUT WHEN SOMEBODY IS IN 'LOVE'.... WANT TO MAINTAIN THEIR RELATIONSHIP IN THEIR OWN WAY...XPECTING A LOT FROM EACH OTHER.. !!!!
THEN.. WHAT 'HE' / 'SHE' MUST BE FEELING..

माझा काव्यप्रयास...त्या दोघांच्या शब्दात........


'' त्याचं '' मनोगत :-


गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस..!!!!


'' ती '' चं मनोगत


झालं तेवढं पुष्कळ झालं
आता आपण माघार घेऊ..
काही सवयी मागे ठेवून
आठवणींचा आधार घेऊ..

आपलं 'नातं ' कसलं होतं
ते कधीच कळणार नाही..
माझ्यापुरतं माझं मन
पुन्हा मागे वळणार नाही...

कित्येक रात्री जागून काढल्या
तुझ्या एका शब्दासाठी..
आता वाटतं उगाच घडल्या
तुझ्या माझ्या भेटीगाठी..

सारं काही विसरून जाणं
काही दिवस अवघड जाईल..
रितेपणात जगण्याची मग
पुन्हा एकदा सवय होईल..

सुरुवात तूच केलीस पण..
शेवट मात्रं मीच करेन
विसर विसर म्हटलं तरी
पुन्हा पुन्हा तुला स्मरेन्… !!!!

"वळण...."


तो मला भेटला त्या वळणावर
जिथे मला मी सावरताना..

केले त्याने मजला त्याचे
ओढ मनाची आवरताना..

तेच वळण तो रस्ता जेथे
धरती आकाशाला भेटे..

इन्द्रधनूवर स्वार होऊनी
वर्षाराणी गर्जत येते..

त्या वळणावर त्याचा-माझा
अबोल अवचित परिचय झाला..

ओळख नव्हती तरीही त्याचा
स्वर माझ्या ह्रदयाला भिडला..

स्वरात त्याच्या गुन्तवूनी मज
क्षणात मग तो मागे वळला..

ओढ लावूनी अंतरीची मज
माझ्या अश्रुतून ओघळला..

त्या सरलेल्या क्षणाबरोबर
अश्रुसुद्धा निसटून गेले..

दूर त्याच त्या वळणावरुनी
आठव होऊन परतून आले..

होऊन वारा पुन्हा पुन्हा तो
असाच मजला स्पर्शून जातो..

त्या वळणावर अस्तित्वाचा
थेंब होऊनी बरसत येतो..!!!!!!

श्वास काट्यांचा......


विस्कटलेल्या चित्रावरचे
विखुरलेले रंग
कुस्करलेल्या फ़ुलांमधला
घुसमटलेला गंध...

अंधारलेल्या वाटेवरची
गोंधळवणारी वळणे
संसाराचा दाह सोसून
चितेवरती जळणे...

सारं काही ओसाड
भग्न्न आणि भकास
रुक्ष वाळवंटात
एका निवडुंगाचा प्रवास...

तहान कोरडी त्याची
सवे तप्त उन्हाच्या ज्वाला
घेईल मोकळा श्वास कसा
काट्यांचे कुंपण त्याला...

काट्याने होती जखमा
काट्याने निघतो काटा
आयुष्याच्या वळणावर
काट्यांच्या पाऊलवाटा...

भरवसा कसा ठेवावा
जखमेने काट्यांवरती
जखमेतून विव्हळणार्‍या
अश्रूंच्या नात्यावरती...

जे मलाच ठाऊक नाही
ते तुला कसे सांगावे
उपभोगातून घडलेले
ते भोग कसे भोगावे...

जो प्रश्न निरुत्तर होता
तो सलतो आहे मनात
जो डाव मांडला होता
तो मोडून जाई क्षणात...

मग कशास जगणे आता
ते मरण अटळ येणार
स्वप्न्नील सुखाचा माझ्या
निष्पाप बळी घेणार...

पण रोज मरण भोगूनही
जग सारे जगते आहे
मृत्यूच आपला उघड्या
डोळ्यांनी बघते आहे...

तरीही जगण्याची आशा
मृत्यूचा केवळ भास
जगण्यास पुन्हा जन्मावे
घेऊन चिरंतन श्वास.......!!!!!

खंत...

मज काय मिळाले काय गमावून बसले
का हिशोब चुकला कधीच कळले नाही..

मी जमाखर्च मांडला चुकांचा पुन्हा
प्रारब्ध भोगल्यावाचून टळले नाही..

झेलल्या उरावर कित्येक जखमा हसूनी
पण नयनातून अश्रू ओघळले नाही..

मी ओंजळ होऊन तुझा सहारा झाले
तुज सावरले, ज्योतीसम जळले नाही..

पोळले हात सोसल्या तप्त मी ज्वाळा
मज खंत एक तव रक्त उसळले नाही..!!!

प्रयास...

तव आस अन्तरी, तुझा रेशमी भास
तू श्वास सुगन्धी, स्पर्श तुझा मधुमास

तू अबोल अवचित, साद मला घालावी
त्या मधुर स्वराची,मलाच ज्ञात मिठास

तू अधीर अलगद, तनूस स्पर्शून जावे
त्या क्षणिक सुखाचा, मनास या हव्यास

नि:शब्द तुझ्या प्रीतीत, गुन्तला जीव
मज प्राणाहूनही प्रिय तुझा सहवास

मम काव्यालाही तुझ्या स्मृतीन्चा गन्ध
तुज स्मरण्याचा हा, माझा खुळा प्रयास ..!!!!

"क्षितीज.."


क्षितीजावरती विखरुन गेले लाल केशरी रंग..
निळ्या आभाळावरी उमटले रुधिराचे तरंग..

क्षणात रजनी मावळली अन दिशा प्रकाशित झाल्या..
लगबग झाली सृष्टीची अरुणोदय समीप आला..

पायघड्या धरणीच्या आणिक सागर घाली स्न्नान..
प्रभात समयी वसुंधरेवर भूपाळीचे गान..

अर्घ्य म्हणून मग मीही माझे काव्य समर्पण केले..
काव्यामधल्या प्रतिभेला रवी चरणी अर्पण केले..

तेव्हापासून ओंजळीत तेजाची कवने झाली..
नव्या प्रभाती नवे काव्य रचण्याची उमेद आली..!!!

"बालपण...."

अजून वाटते कधीकधी की.. पुन्हा एकदा लहान व्हावे..
खोड्या काढून.. खाऊन रट्टा हळूच आईच्या कुशीत शिरावे..

बरसत येता टपटप पाऊस होड्या सोडत चिंब भिजावे..
पुन्हा नव्याने गोष्टी ऐकत आजीच्या पदरात निजावे..

पाहून दप्तर मित्राचे मी बाबांजवळी हट्ट करावा..
रुसून कोपर्‍यामध्ये बसूनी अबोल अट्टाहास धरावा..

भातुकलीच्या खेळामध्ये करुन जेवण व्हावे आई..
कधी तपासून जुन्या वह्यांना घेत हजेरी व्हावे बाई..

भावविश्व नाजूक निरागस दु:खाचा लवलेश नसावा..
गप्पा गोष्टी गाण्यांमधूनी स्वप्नांचा उन्मेष हसावा..

क्षण सारे ते निसटून गेले.. उरली केवळ एक आठवण,
तरीही उरतो प्रश्न अनामिक सरले कैसे माझे बालपण..

सवयीने मी आई आणिक बाबांना हा प्रश्न करावा..
पुन्हा लावूनी हात कपाळी त्यांनी माझा कान धरावा..

"यक्षप्रश्न हा अनुत्तरित जो उत्तर नाही कुणास अवगत..
जीवन अपुले ऋतूचक्रासम चालत राहते अखंड अविरत..

आयुष्यातील वसंत सरला.. बालपणातच.. समजून घ्यावे..
संस्कारांचा मोहोर जपण्या पुन्हा एकदा लहान व्हावे..
..........................................पुन्हा एकदा लहान व्हावे..!!!"

'' नकोच.. .. .."

नकोच आशा नको दिलासा
नको व्यथांचा रिता उमाळा..

नकोच वचने नको खुलासा
नको स्मृतींचा रुक्ष जिव्हाळा..

नकोच रुसवा नको बहाणा
नकोच फसवे शब्द लाघवी..

नकोच लटका राग शहाणा
नको बोलणे मृदु आर्जवी..

नकोच स्वप्ने नको कल्पना
नको अवास्तव वृथा अपेक्षा..

नकोच जखमा नको यातना
नकोच फुंकर नको प्रतिक्षा..

नकोच प्रीती नको वंचना
नकोच चिंतन जुन्या क्षणांचे..

नकोच नाती नको वल्गना
नकोच ओझे तुझ्या ऋणांचे..

नकोच कोणी नकोस 'तू' ही
नको नकोसा मलाच 'मी' ही..

तरी अखंडीत उरलो माझा
मीच एकटा विरक्त देही.. !! ......

'' शब्दबहर..."

आज खूप दिवसांनी शब्दांना पालवी फुटली
शब्दकळ्या शब्दफुले.. शब्द शब्द वेचत सुटली

शब्द अधीर शब्द बधीर शब्द मुळी सुचत नव्हते
सुचत होते शब्द जे.. ते मनापासून रुचत नव्हते

अखेर शब्द विरुन गेले ओठामागे काळोखात
पुन्हा सुरु पानझड मनामध्ये आतल्याआत

असंच होतं जेव्हा जेव्हा तुझी माझी भेट होते
शब्दामागून शब्द येतात वेळ मात्रं निघून जाते

सांगायचं असतं तुला तेच नेमकं राहून जातं
शब्दांना पूर येतो.. सुचलेलं वाहून जातं

शब्दांच्या ओघात असं.. शब्दांचं हसं होतं
काय सांगू कसं सांगू? कित्ती सांगू असं होतं

म्हणून सांगते.. ऐकशील का???

माझ्या एका शब्दाखातर स्वप्नामध्ये येशील का
मागायचं आहे तेच.. न मागता देशील का??

म्हणजे मन मोकळं होईल शब्द अडून राहणार नाहीत
तुझ्या एका शब्दासाठी.. तुझी वाट पाहणार नाहीत…!!!

'' जमेल ??? "

उदास वाटा , उदास वळणे;
वळणावरती उगाच वळणे..

आठवणींच्या उंबरठ्याशी..
पुन्हा पुन्हा माझे घुटमळंणे..

सरेल का ही पायपीट;
अन सुन्या सावल्यांपाठी पळणे..

निवांत मृत्यूशय्येवरती..
निपचित लाकूड होऊन जळणे..?

जमेल का मज कठोर होऊन
निर्जीव पाषाणासम जगणे..

त्रयस्थ दृष्टी ठेवून माझ्या
तटस्थ आयुष्याला बघणे..?

जमेल सारे .. जमेल तेव्हा..
सरेल अवघे माझे मीपण..

उरेन माझी मीच एकटी..
अन..
विवंचनांचे विशाल अंगण !!! ??

आयुष्यं . .''

घडले होते बरेच काही..
तरी नव्याने घडते आहे..
रोजच्याच त्या वाटेवरती..
पाऊल नकळत पडते आहे..

दिवस कालचा उगवून गेला..
रात्र पुन्हा मावळते आहे..
जुन्याच आशा.. नव्या उमेदी..
भविष्य चिंता छळते आहे..

गतकाळाच्या रम्य स्मृतींना..
पुन्हा उजाळा कशास देऊ..??
विसरु म्हणते झाले गेले..
चुकले तेव्हा कळते आहे..

भले जाहला उशीर थोडा..
वेळ जराशी निघून गेली..
अविचाराला सुधारण्याची.
नवीन संधी मिळते आहे..

म्हणून आता जगेन म्हणते..
व्यवहारी अन विरक्त होऊन..
आता कुठेसे आयुष्याशी..
सशक्त नाते जुळते आहे... !!!