Friday, March 11, 2011



केशर सांडले.. हिरव्या रानात...
खारट पाण्याला.. लाली आली..
क्षारांचे अमृत .. रांगोळी रेखित..
मातीची कूसही.. ओली झाली... !!

संध्येची सोबत.. चिंचोळ्या वाटेत..
उन्हाची रंगत.. दूर गेली..
मिळता सोबत.. पाऊलवाटेत..
सख्याची संगत.. सूर झाली..!!

कींचित से लांब ..सवित्याचे बिंब..
मीरा झाली चिंब.. संध्यावेळी..
गोकुळाची सांज.. पाहूनीया धुंद..
माझीही पाऊले.. तिथे गेली..

शहरापासून.. निवांत रांगेत..
चालण्याची मौज.. मला आली..
जीवनाचे सार.. जाणूनीया थोर..
चित्रात बंदीस्त ..संध्या झाली..!!

Thursday, March 10, 2011

जन्म कवितेचा ॥




धुमसु लागतात शब्द मनात एकाएकी ,,
आणि भावनांचा उद्रेक होतो........
धगधगत्या अतृप्त इच्छा पेटून उठतात अवेळीच
आणि स्वप्नांचा शेवट होतो॥
पसरु लागतो अविचाराचा वणवा रानोमाळ...
आणि जळत जातात नव्याने पालवलेली आशेची कोवळी झाड
...भस्मसात होत एका क्षणात
वर्षानुवर्ष जपलेल अस्तित्वाच चैतन्य .... कर्तृत्वाच लावण्य ...
वक्तृत्वाच नैपुण्य आणि बरच काही .....
मागे उरतो तो फ़क्त राखेचा सडा...

"आपण जन्मलो होतो केव्हातरी ..... याची आठवण करून देणारा...!!
म्हटला तर नगण्य ...
म्हटल तर तेवढच काय ते पुण्य...
निदान मरताना तरी आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा का होइंना ॥
आहेत मागे...
बस यातच समाधान... !!
सगळी धडपड केवळ स्वत्वासाठी॥
"मी" " माझ" " मला" माझ्यामुळे" " माझ्यासाठी" ....
सगळी लढाई फक्त या स्वार्थासाठी ॥
छे.... छे... स्वत्वासाठी ॥
लुटुपुटुची असंख्य द्वंद्व मनात निरंतर सुरु असतात.....
कधी मी जिंकते... तर कधी मीच हरते ...
पण प्रत्येक वेळी जन्माला येत ते... माझच॥
अबाधित अस्तित्व ....
" कवितेच्या रुपाने" !!!!......

Wednesday, March 9, 2011

तुझ्याचसाठी....



ओढ अनामिक आत्म्यामधली... तुझ्याचसाठी..
स्तब्ध स्पन्दने हृदयामधली .... तुझ्याचसाठी..

अधीर नयने जागृत रात्री.... तुझ्याचसाठी..
कातर कम्पित हुर हुर गात्री.... तुझ्याचसाठी..

प्राजक्ताचा बहर अन्गणी... तुझ्याचसाठी..
मालकन्स - मल्हार रागिणी .... तुझ्याचसाठी..

अवखळ वारा.. अल्लड गाणी... तुझ्याचसाठी..
मोरपिसारा .. प्रीत दिवाणी.... तुझ्याचसाठी..

सहवासाची सूक्ष्म विनन्ती... तुझ्याचसाठी..
थकले पाऊल तरी भ्रमन्ती.... तुझ्याचसाठी..!!!!

क्षण एक पुरेसा ....



क्षण एक पुरेसा .. कठोर होऊन जगण्यासाठी..
अखन्ड अविरत ...अस्तित्वाशी लढण्यासाठी....

क्षण एक पुरेसा ..स्वप्नाना अनुभवण्यासाठी..
निजून अलगद ...भरून डोळे पाहण्यासाठी..

क्षण एक पुरेसा .. तुझ्या नि माझ्या भेटीसाठी..
आठवणी आजन्म गाठीशी जपण्यासाठी..

क्षण एक पुरेसा ..मीच मला ओळखण्यासाठी..
आत्म्याला नखशिखान्त जणू पारखण्यासाठी..

क्षण एक पुरेसा ..वळून मागे बघण्यासाठी..
पुन्हा नव्याने दीर्घ प्रवासी निघण्यासाठी.. !!!

मन....



थकते मन का कधी कुणाच्या आठवणीने व्याकुळ होऊन..
का गजबजते अन्तर्यामी जुन्या स्मृतीन्चे गोकुळ होऊन..?

शिकते मन का नात्यामधल्या हिशोबातली गफलत पाहून ..
घाव सुखाचे सत्यामधले.. सहज उरावर अलगद साहून..?

निघते मन का .. अडखळल्यावर पुनःप्रवासी अलिप्त राहून...
का गदगदते अश्रूसन्गे कोपर्‍यात एकाकी राहून..?

कळते मन का कधी कुणाचा नितळ निरागस चेहरा पाहून..
अनुभव घेतो निर्णय सारे... आयुष्याच्या समिधा वाहून...!!!

Thursday, March 25, 2010

पाऊल. .!!


पडते पाऊल ... फसते पाऊल ...
अडते पाऊल ... वाटेवरती...
वळते पाऊल ... ढळते पाऊल ...
हळहळते अडखळल्यावरती..

चुकते पाऊल ..... हुकते पाऊल ....
शिकते पाऊल ... वळणावरती...
विटते पाऊल ... उठते पाऊल ...
थकते पाऊल ... सरणावरती...

अल्लड पाऊल... अवख़ळ पाऊल ...
प्रगल्भ पाऊल ... कळल्यावरती....
अधीर पाऊल ... अलगद पाऊल ...
खंबीर पाऊल ... शिखरावरती ...!!!

Sunday, September 13, 2009

आनंदी आनंद गडेचे विडंबन :-

"तरुणाई"...........

धडधड माझे हृदय उडे ..
बघता ललना चोहीकडे.. ll

नटण्यामध्ये दिवस सरे
बंटी बबली सवे फिरे
काळ बदलला.. मुली न कळल्या.. कश्या बदलल्या..
कपडे तोकडे.. चोहीकडे.. ll १ ll

डिस्क रिमिक्स चंदेरी हे..
सिनेजगत भुलवीत आहे..
"तरुणाई" त्या ओघाने..
बघा कशी वाहते आहे..
चित्त भंगले .. वित्त खंगले .. पालक दमले..
जिकडे .. तिकडे.. चोहीकडे.. ll २ ll