आज व्हाॅट्स अप वर एक खूप छान विचार वाचला. "रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. तसंच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे."
किती सुरेख कल्पना आहे हीे!! आजूबाजूला यंत्रवत वावरणारी माणसं पाहीली की वाटतं, नक्कीच काहीतरी चुकतंय. रोजच सकाळ होते, मग रात्र, मग पुन्हा सकाळ. तेच ते करत जगणं नक्कीच कंटाळवाणं आहे. पण जेव्हा पासून मी ठरवून लिहायला लागलेय तेव्हापासून जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त आणि फक्त काय लिहू याचेच विचार येतात. मला वाटतं, आपल्या रोजच्या आयुष्यात एखादा ध्यास घेऊन आपण जगलो तर बाकी त्रासदायक रूटीन गोष्टी खूपच क्षुल्लक वाटू लागतात.कधी कधी कुणा दुसऱ्याच्या वागण्याने आपल्या आयुष्याला गंज लागतो. अशा वेळी परीसस्पर्श हवा छंदाचा. मग आयुष्याचं सोनं झाल्याखेरीज राहणार नाही.
खूपदा अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा असेच लोक विश्वासघात करतात, जवळच्या व्यक्तीच परकेपणाने वागू लागतात, केलेल्याची काही लोक जाणीव ठेवत नाहीत आणि आपल्यालाच आपल्या चांगुलपणाची चीड येऊ लागते. अनुभवातून शहाणपण येतं असं म्हणतात. पण मी म्हणेन वाईट अनुभवातूनच अधिक जास्त शिकत जातो आपण.
आपल्या सारखीच प्रत्येक व्यक्ती पारदर्शी कशी असेल. आपल्याला वाटतं नातीे नव्हे मनं जोडतो आपण. व्यवहार, स्वार्थ, हीशोब,अहंकार यांच्याही पलिकडे जाऊन झोकून द्यायचं असतं नात्यात. पण अपेक्षाभंग हे नात्याचं अलिखीत फळ. हळू हळू चांगल्या वाईटाचीही सवय होत जाते. पण त्याची सल काही केल्या मनातून जात नाही. मनावरचा ओरखडा कायमचा होऊन जातो. मग मन त्याच वळणावर घुटमळतं. आपण थांबलो की सगळंच थांबतं. आपली प्रगती, उत्साह,वेग, उत्कर्ष, स्वप्नं.
खरंतर आयुष्यात लिफ्ट सारखं वर जाताना कधी कधी थांबावंही लागतं. निगेटीव्ह गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखवावा लागतो आणि पाॅझिटीव्हीटीला आतला. जसा लिफ्टचा वेग आपल्या हातात नसतो तसा आयुष्याचाही.
चढ उतार हे येणारच. मग उतारावर बघावं सोबत कोण कोण आहे आपल्या. पडत्या काळातही हात देतात ते आपले. चढत्या काळात तर सगळेच असतात सोबत... निदान भासवायला तरी.
चढ उतार हे येणारच. मग उतारावर बघावं सोबत कोण कोण आहे आपल्या. पडत्या काळातही हात देतात ते आपले. चढत्या काळात तर सगळेच असतात सोबत... निदान भासवायला तरी.
कोण सोबत असो अथवा नसो.. छंद आपली आयुष्यंभर साथ देतात. एकटेपणा समृद्ध करतो तो छंद, साऱ्या जगाचा विसर घडवतो तो छंद, कुणी कौतुक करो अथवा न करो पण आपल्याला आपलंच कौतुक करायला भाग पाडतो तो छंद.. चला तर मग. शोध घेऊया आपल्याला नक्की काय आवडतं याचा. म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातही आपला सूर आपल्याला गवसेल. आणि टेन्शन खऱ्या अर्थाने खलास होईल.
मला कविता, लिखाण, गाणं, पाककला खास करून बेकींग, हस्तकला, पेंटींग आणि सातत्याने नाविण्याचा शोध घेण्याचा छंद आहे. मला जाणून घ्यायला आवडेल, तुमचे छंद कुठले आहेत ते. सांगा बघू पटापट...
टीप: कृपया कॅंडी क्रश ला छंद म्हणून नमुद करू नये.

No comments:
Post a Comment