परवाच परिझाद येऊन गेली. परिझाद म्हणजे मला अजूनही न उमगलेली पेशन्ट. हो.. कारण एक दोन भेटीत आता माणसं नखशिखांत ओळखायची प्रॅक्टिस झालीय. पण ही अजूनही माझ्या साठी कोडंच आहे न उलगडणारं. ती जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आली, सहा महिन्यापूर्वी तेव्हा ही अशीच ... अपॉइंटमेंट न घेता.. मी म्हटलं तिला इथे औषध सुरु करण्यापूर्वी आम्ही हिस्टरी घेतो. ज्या साठी आधी वेळ घेऊन यावं लागतं. पण तीचं म्हणणं होतं की आत्ता औषध द्या. मग मी वेळ काढून येते हिस्टरी द्यायला. ती ऐकेचना. शेवटी पाहिलं तर तिच्या दोन्ही पायांना ७-८ भवऱ्या (corn) होत्या. ज्या साठी तिनं भरपूर औषधं, कापाकापी, कॅप इत्यादी सगळं करून पाहिलं होतं. तसा कॉर्न माझ्या हातचा मळ आहे त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. औषध सुरु करते पण इम्प्रूव्हमेंट जर दिसली नाही तर मात्र हिस्टरी द्यावीच लागेल.
साधारण माहिती गोळा करताना कळलं की ती कतार ला आपल्या नवऱ्या सोबत राहते. मुलाला लहानपणापासून आईकडे इथं मुंबईला सोडलंय. कारण नवऱ्याला तिची जास्त गरज आहे. तिथे कतार ला म्हणे लेबर महाग आहे ना. मग नवऱ्याची वरची कामं करायला कोणी नको का. मला ऐकून जरा कससंच झालं. परिझाद ने सगळं कम्युनिकेशन इंग्रजीतच केलं. ट्राउझर आणि सफेद शर्ट, निसर्गतः च सरळ केस आणि गोऱ्या वर्णाची परिझाद वाटत तर सुशिक्षित च होती. तिचा तो टिपिकल पारसी अॅक्सेंट ऐकून तिची नक्कल करण्याचा मोह होत होता जो मी कसा बसा आवरला. तिच्या म्हणण्याप्रमाणे बाजारहाट, जेवण-खाण, कपडे भांडी लादी सगळं तीच करते. खूप दुखत होते तळवे म्हणून तिथल्या सरकारी रुग्णालयात तिची ट्रीटमेंट नवऱ्याने करून दिली पण त्याचा काही फायदा झाला नाही. इथे मुंबईत स्वस्त असतील उपचार असा विचार करून नवऱ्याने यंदाच्या दौऱ्यात तिला इथला डॉक्टर ट्राय करायची परवानगी दिली होती. आणि हो जर डॉक्टर गॅरंटी देत असेल तरच उपचार सुरु कर असंही सांगितलं होतं.
फक्त प्रॉब्लेम हा होता की ती महिन्याभरासाठीच मुंबईत होती. आणि मग पुढच्या पाच महिन्यासाठी कतार ला निघणार होती. त्यामुळे जे औषध देईन ते एकदाचच. त्यात काही फेरबदल करता येणं शक्य नव्हतं. मी आधी १५ दिवसाचं औषध दिलं. आणि ३०० रूपये झाले असं सांगितलं. तर ही म्हणाली माझ्याकडे आता ५०च रुपये आहेत. मी तुम्हाला थोडे थोडे करून आठवड्याला पैसे देईन. इतकी चांगल्या घरातली बाई आणि फक्त पन्नास रुपये गाठीला घेऊन. आणि त्यात ओळख ना पाळख हिला का म्हणून हा उधारीचा ऑप्शन द्यावा. पण मला काही त्या क्षणी नाही म्हणता आलं नाही म्हणून मी तिची अट कबूल केली. नाही म्हणायला दर आठवड्याला शम्भर दीडशे करत तिने पैसे चुकते केले.
पुढच्या खेपेला आली तेव्हा चार आणे फरक आहे म्हणाली. तितक्यात तिच्या मुलाचा फोन आला. तो कदाचित हिच्याशी भांडत असावा. कारण फोन मधला आवाज स्पष्ट पणे बाहेर मला ऐकू येत होता. ती फक्त हो नाही म्हणत होती. इतक्यात तिचा मुलगाच क्लिनिकच्या केबिन मध्ये शिरला. कटकटीच्या सूरात हिच्या कडून घराची चावी घेऊन बाहेर पडला. हिनं काहीच झालं नाही या आविर्भावात मला विचारल, "औषधाचे किती झाले?" मी हिरीरिने सांगितले, पण पुन्हा तिच्या कडे द्यायला पैसे नव्हतेच. पुन्हा एकदा पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या विश्वासाला मी संजीवनी दिली आणि तिला औषध देऊ केलं.
सहा महिन्यापूर्वी शेवटचं आली तेव्हा म्हणाली, "My husband said if your doctor is saying you need to continue medicine for long then maximum I can afford to give you one months time. if that works then Ok or else forget it." आता इतकं कळलं होतं की हिचा नवरा हिटलरचा भाऊ असावा. हुकूमशहाच जणू. मी ठीक आहे म्हणून एक महिन्याचं औषध दिलं. आणि बाकी आशाच सोडून दिली. या वेळेस पैसे वेळेवर मिळाले. तेवढाच काय तो आनंद. ती कतारला परतली.
अधे मध्ये तिचा व्हाट्स अप यायचा. पायाचा फोटो पाठवून ती स्टेटस कळवायची. मीही उत्तर द्यायचे. औषध पुरवून पुरवून वापरायला शिकवायचे. मागच्या आठवड्यात आली तीच थँक्यू म्हणत. "Doctor, you cured me. in our custom the one who cures is God. So i have to give you something in return. i will bring it in the evening." मी म्हटलं तिला हे तर माझं कर्तव्यच होतं. पण ती ऐकेचना. मी येते हा संध्याकाळी असं म्हणून तिने निरोप घेतला. आणि ती काही आलीच नाही. मी तर विसरूनही गेले. पण परवा आली ना ती. खजूर आणि चाॅकलेट्स घेऊन. "Doctor you have to accept it. Please don't say No." मी स्विकारलं. आणि विचारलं, "मग काय. आता किती दिवस मुक्काम भारतात?" तर ती म्हणाली "I don't know. Actually now my son got admission for hotel Management. Daily he has to wear white,clean and well ironed clothes. So he wants me to do the needful. My mother is too old to manage. So I will stay here."
आता मात्र मला परीझाद एक आई किंवा पत्नी न वाटता घड्याळाचा लोलक वाटली. तिचं हे तळ्यात मळ्यात असणं मला काही रूचलं नाही. आजही काही नवरे पूर्ण वेळ गृहीणी असलेल्या स्त्री ला खूपच गृहीत धरतात. आणि मग मुलं ही त्यांचं अनुकरण करतात. अर्थात स्त्री ही त्याला तितकीच जबाबदार आहे. "माझ्या शिवाय ना माझ्या घराचं पान ही हलत नाही" ही भावना जितकी सुखद आहे तितकीच ती तुमच्या आप्तांना परावलंबी बनवण्यास खतपाणी घालणारी आहे.
प्रत्येक स्त्रीचं स्वतःचं असं एक विश्व आहे. ज्यात तिला तिच्या पद्धतीने विचार करण्याचा अधिकार आहे. घरकामाला कधीतरी सुट्टी दिली, एक दिवस बाहेरू जेवण मागवलं किंवा आज कंटाळा आला म्हणून काही केलंच नाही तर दुनिया इकडची तिकडे होत नाही. उलट थोडासा आराम उद्याचा दिवस जोमानं सुरू करायची उमेद देतो.
गृहीणीच्या आयुष्यात ना रविवार असतो ना प्रिविलेज किंवा सिक लीव. तिला ही ब्रेक हवासा असतो. तिच्या असण्याची जाणीव ठेवा. ती आहे म्हणून घराला घरपण आहे. तिला मानानं जगवा.. कारण तिला ही मन आहे, भावना आहेत. फक्त तिच्या आयुष्यात तिची priority 'ती' नाही तर तिचं कुटुंब आहे. दोन कौतुकाचे शब्द ही तिचा दिवस घडवू शकतात. जर तुमच्याही आयुष्यात अशी एखादी परीझाद असेल तर तिला परी सारखं नाही वागवलं तरी चालेल पण निदान माणसासारखं वागवा.
:)

No comments:
Post a Comment