Friday, January 20, 2017

"आपला खेळ होतो.. त्यांचा जीव जातो."

आज खरा चर्चेला विषय मिळाला. अचानक रात्री ८:३० च्या सुमारास माझ्या क्लिनिकच्या खाली भल्या ट्रॅफिक मधून वाट काढत एक फायर ब्रिगेड आली. तितक्यात माझ्या समोर बसलेल्या पेशंट ला कुणाचा तरी फोन आला की एम जी रोड वरून गाडी काढू नकोस. फायर ब्रिगेड आल्या मुळे बघ्यांची गर्दी जमलीय. तो पेशन्ट समोरून उठून बाहेर गेला तोच मला माणसांची आरडा ओरड ऐकू आली.. "आने दो .. आने दो ..." पाहते तर अख्खा एम जी रोड सोडून अग्निशमन दलाची गाडी माझ्याच क्लिनिकच्या इमारतीखाली. आता जरा माझी तंतरली पण उत्सुकता सुद्धा ताणली गेली.
रिसेप्शनिस्टला विचारलं तर ती ठाम पणे म्हणाली, "आग लागली वाटतं. म्हणूनच आली असेल गाडी." अरेच्चा.. मग सायरन का बरं नसेल वाजला? अजून एक प्रश्न मनात उभा राहिला. तोच आमचा वॉचमन उर्फ खबरी आला मला सांगायला, "मॅडम वह आपका गाडी जरा आगे लेलो रस्तेसे. वह क्या है की झाडपे कव्वा फसा है पतंग के धागे मे. आदमी फसता तो नही आती यह गाडी इतना जल्दी." चला ss एकदाचं कारण कळलं. थोडी हळहळ वाटली पण जीवाला जरा शांती मिळाली.
खाली गेले तर हा जनसमुदाय. एखादा अॅक्शन सीन चकटफू बघायला मिळणार म्हणून काम धंदा सोडून बायका पोरं वर झाडाला डोळे लावून बसलेली. मी आपली गाडी पुढे लावून आले. फायर ब्रिगेडचे २ जवान शिडी उंचावून जखमी कावळ्यापर्यंत पोहोचायचा असफल प्रयत्न करत होते. पण मी काही पुढलं पहायला थांबले नाही.
माझ्या मनात वेगळंच विचारचक्र सुरू होतं. बिच्चारा कावळा..की बिच्चारे जवान..? भूतदये पर्यंत ठीक आहे. पण समजा झाडावर पोहोचताना जवानाला काही इजा झाली.. तो अपंग झाला.. दगावला.. किंवा त्याची बायका मुलं कायमची पोरकी झाली किंवा त्या क्षणी खरंच एखादी इमर्जन्सी आली तर ही गाडी पुन्हा ट्रॅफिकमधून तिथपर्यंतं पोहोचू शकेल? प्रत्येक वेळी संक्रांती पुरता पक्ष्यांच्या जीवाचा प्रश्न उभा राहतो. नंतर जवानांच्या जीवाचाही राहील.
मग इजा होईल अशा नायलाॅन मांज्याच्या उत्पादनावर बंदी का नाही आणली जात. का आपण दुसऱ्याच्या जीवाची किंमत समजू शकत नाही? का आपण आपल्या चुकीच्या हौसेला मुरड घालू शकत नाही? मला फक्त शाळेतली बेडकाची गोष्ट आठवली आज.. "आपला खेळ होतो.. त्यांचा जीव जातो." इतकंच खरं !

No comments: