Saturday, January 17, 2009

भाग्यं..!!!


११ जुलै २००७ ला ट्रेन मध्ये विस्फोटांची श्रुंखला झाली.. तेव्हा सुचलेली ही कविता...!!
असे हल्ले पुन्हा होत राहीले.. होत आहेत.. पण मानसिकता मात्र तीच आहे..!!

'' भाग्यं !!! ''

विपरीत काही.. ऐकू आले कानी..
चित्त थार्‍यावरी.. कुठले रे आता..

आपलेसे कुणी.. गुंतले क्वचित..
काहूर अंतरी दाटले रे आता..

पाणावले डोळे.. पाहताना वाट..
कंप काळजात.. उठले रे आता..

थोडासा उशीर.. उरी तगमग..
पाण्याखाली देव.. ठेवले रे आता..

लागता चाहूल .. कळता खुशाली..
पारणे डोळ्यांचे.. फिटले रे आता..

तरी हुरहुर.. कुणा- कुणासाठी..
नसतील ज्यांची.. माणसे रे आता..

निष्पाप श्वासांना.. जगायाचे होते..
जगण्याशी नाते.. तुटले रे आता..

फक्तं एक सुख.. नव्हते मी तिथे..
सोयरे ही माझे.. सुटले रे आता..

उगीच कशाला.. विचार भलते..?
भाग्यं माझे मोठे.. वाटले रे आता..

विसरून सार्‍या दु:खाचे उमाळे..
निश्चिंत मी डोळे.. मिटले रे आता.. !!!

1 comment:

Waman Parulekar said...

आपल्या कविता खरच छान आहेत..बरेच दिवस कविता नाही केली वाटतं...लिहीत राहा...
-वामन