Thursday, January 8, 2009

संकल्प !!!


अनभिषिक्त मी सम्राट जगाचा झालो
तर करेन होळी भ्रष्ट दुष्ट कर्माची..
तळहातावरती जपेन दीन प्रजेला
अन भरेन झोळी सत्वशील धर्माची..

रक्तातच असते वेड गगनभेटीचे..
पंखांची किमया यात जराही नाही...
गरुडाचे छाटून पंख लाव घुबडाला..
ती झेप विलक्षण तयास जमणे नाही..

मी सत्य जाणतो.. तत्वाचे सत्वाचे..
ना कुणा शक्य ही कर्तृत्वाची उधारी..
ते रक्त घेऊनी आलो मी जन्मास..
मज गगन थिटे घेण्यास विमुक्त भरारी..

मी करेन कायापालट या विश्वाचा..
विश्वास असा दृढ सदैव माझ्या चित्ती..
संकल्प जुने ते झाले गेले सारे..
सिद्धीस नव्याने नेण्याची मम वृत्ती..

सरत्या वर्षाच्या सवे त्रुटीही सरल्या..
पण अटींस मी बांधील राहीलो नाही..
मी गुढी उभारुन संकल्पांची सज्ज..
पण पूर्णत्वाचा धनी जाहलो नाही..

या नव्या पहाटे पुन्हा नवा संकल्प..
मी नव्या दमाने करतो आहे पुन्हा..
स्वप्नांना द्यावी जरा कृतीने जोड..
या हट्टासाठी झटतो आहे पुन्हा..

संकल्प नसे हा माझा.. सर्वांचा तो..
पुर्तता तयाची व्हावी हीच सदीच्छा..
जिंकून मने सर्वांची.. व्हा सम्राट..
या सम्रटाची हीच तुम्हा शुभेच्छा.. !!!

4 comments:

स्वाती आंबोळे said...

>> रक्तातच असते वेड गगनभेटीचे..
>> पंखांची किमया यात जराही नाही...

he khara! :)

'kartRutvaachee udhaaree' madhe lay bhangate aahe.

Yogi... Yo Rocks.. !! said...

khup chhaan kavitaa !!IInd stanza ultimate vaatalaa..
too gd.. Pjs Kavitaas r simply superb !! :)

mahesh said...

Good poems..........I like It

Dr. Abhay deora said...

That was really Nice