Saturday, January 17, 2009

भाग्यं..!!!


११ जुलै २००७ ला ट्रेन मध्ये विस्फोटांची श्रुंखला झाली.. तेव्हा सुचलेली ही कविता...!!
असे हल्ले पुन्हा होत राहीले.. होत आहेत.. पण मानसिकता मात्र तीच आहे..!!

'' भाग्यं !!! ''

विपरीत काही.. ऐकू आले कानी..
चित्त थार्‍यावरी.. कुठले रे आता..

आपलेसे कुणी.. गुंतले क्वचित..
काहूर अंतरी दाटले रे आता..

पाणावले डोळे.. पाहताना वाट..
कंप काळजात.. उठले रे आता..

थोडासा उशीर.. उरी तगमग..
पाण्याखाली देव.. ठेवले रे आता..

लागता चाहूल .. कळता खुशाली..
पारणे डोळ्यांचे.. फिटले रे आता..

तरी हुरहुर.. कुणा- कुणासाठी..
नसतील ज्यांची.. माणसे रे आता..

निष्पाप श्वासांना.. जगायाचे होते..
जगण्याशी नाते.. तुटले रे आता..

फक्तं एक सुख.. नव्हते मी तिथे..
सोयरे ही माझे.. सुटले रे आता..

उगीच कशाला.. विचार भलते..?
भाग्यं माझे मोठे.. वाटले रे आता..

विसरून सार्‍या दु:खाचे उमाळे..
निश्चिंत मी डोळे.. मिटले रे आता.. !!!

Sunday, January 11, 2009

गणित !!!


तसा माझा गणिताशी .. पूर्वीपासूनच ३६ चा आकडा..
म्हणूनच की काय..आयुष्याचं गणितसुद्धा सुटता सुटलं नाही..
उणे अधिक करत जुळलेल्या नात्यांत..आपलं म्हणावं असं कुणी भेटलं नाही..
पुन्हा म्हणून पाहीला.. आयुष्याचा पाढा..पुन्हा मोजून काढल्या गतकाळाच्या चुका..
पण त्या एकसूरी गणिताच्या गाण्याला..नव्हता शाश्वत तालाचा ठेका..!
सगळीच समीकरणं क्षणिक होती..पण विचार करायला लावणारी..
आकडेमोडही बरीच होती..दहा बोटांत न मावणारी..!
पण मी मोजत गेले सरसकट..कधी बरोबर.. तर कधी चुकत चुकत..
एखाद दुसरे हातचे सोडले तर..सगळीच बाकी शून्य होती..
आणि बाकी धरून गणती केली..तरी सारी हयात नगण्य होती..
असं आयुष्याचं क्लीष्ट गणित.. काही केल्या सुटलं नाही..
संदेहाचा कलह सुरूच्..वादळ काही मिटलं नाही..
हातावरच्या भाग्यरेषा.. फक्त सोबत पुसत गेल्या..
अन वर्ष वजा होता होता.. काही ओळी सुचत गेल्या..
घडली कविता.. भिडले शब्द.. जुळून आला ताळमेळ..
आयुष्याचं गणितच अजब.. पण सरावाचा झालाय खेळ..!!!

मौन..!!!


बोलायाचे नव्हते काही..
पण मौन पाळता आले नाही..
शब्दच वेडे फितुर होते..
की अश्रू गिळता आले नाही..

तुझी ओळख पटते तेव्हाच
परकेपणा बोलका होतो..
पण संवादाची ओढ अजब
बोलणे टाळता आले नाही..

आजसुद्धा रोजच्यासारखे
कुलुपबंद ओठ होते..
पण निर्विकार चेहरा ठेवून
हास्य गाळता आले नाही..

अन दोन शब्द तुझे जेव्हा
अवचित आले कानावर..
तोच सार्‍या अटी विलग करून..
दूर पळता आले नाही..

पुन्हा पुढल्या शब्दासाठी..
वाट पाहणे मंजूर होते..
शब्दांचीच चाकरी बरी..
शून्यात वळता आले नाही..!!!

Thursday, January 8, 2009

संकल्प !!!


अनभिषिक्त मी सम्राट जगाचा झालो
तर करेन होळी भ्रष्ट दुष्ट कर्माची..
तळहातावरती जपेन दीन प्रजेला
अन भरेन झोळी सत्वशील धर्माची..

रक्तातच असते वेड गगनभेटीचे..
पंखांची किमया यात जराही नाही...
गरुडाचे छाटून पंख लाव घुबडाला..
ती झेप विलक्षण तयास जमणे नाही..

मी सत्य जाणतो.. तत्वाचे सत्वाचे..
ना कुणा शक्य ही कर्तृत्वाची उधारी..
ते रक्त घेऊनी आलो मी जन्मास..
मज गगन थिटे घेण्यास विमुक्त भरारी..

मी करेन कायापालट या विश्वाचा..
विश्वास असा दृढ सदैव माझ्या चित्ती..
संकल्प जुने ते झाले गेले सारे..
सिद्धीस नव्याने नेण्याची मम वृत्ती..

सरत्या वर्षाच्या सवे त्रुटीही सरल्या..
पण अटींस मी बांधील राहीलो नाही..
मी गुढी उभारुन संकल्पांची सज्ज..
पण पूर्णत्वाचा धनी जाहलो नाही..

या नव्या पहाटे पुन्हा नवा संकल्प..
मी नव्या दमाने करतो आहे पुन्हा..
स्वप्नांना द्यावी जरा कृतीने जोड..
या हट्टासाठी झटतो आहे पुन्हा..

संकल्प नसे हा माझा.. सर्वांचा तो..
पुर्तता तयाची व्हावी हीच सदीच्छा..
जिंकून मने सर्वांची.. व्हा सम्राट..
या सम्रटाची हीच तुम्हा शुभेच्छा.. !!!