Thursday, January 26, 2017

Who are We to draw the line ?

कालच मीराचा फोन आला. मीराची आणि माझी ओळख तशी हल्लीचीच. माझ्याच डॉक्टर मैत्रिणीच्या रेफरन्सने ती माझ्या कडे येऊ लागली.. हल्ली ती वरचेवर आजारी पडायची. तिला यातून बाहेर पडायचं होतं. तशी मीरा एका सुखवस्तू जैन मारवाडी कुटुंबात वाढलेली आई वडिलांची दोन मुलीपैकी मोठी लाडाची मुलगी. खाण्या पिण्याला तोटा नाही. एका मल्टीनॅशल कम्पनीत चांगल्या हुद्यावर ती कार्यरत आहे. आणि आता लग्नाचं वय झाल्या मुळे घरी युद्ध पातळीवर मुलं दाखवण्याचा कार्यक्रमही होत असे.
मीरा तशी शांत आणि सुस्वभावी, नक्षत्रा सारखी देखणी. उगाच कुणाच्या अध्यात मध्यात नसणारी. ऑफिस मधील लोकांना ती शिष्ट वाटे. पण तिला पाहिलं की नेहमी जाणवायचं हिच्या मनावर कसलं तरी दडपण आहे. एवढ़ी मोठी मुलगी पण नेहमी आई सोबतच क्लिनिक ला यायची. खरं तर आईच्या काळजाचा तुकडाच होती ती. केस च्या निमित्ताने खूप विश्वासाने तिनं माझ्याशी हे शेअर केलं होतं की तिला एक मुलगा आवडतो. तो तिच्या जुन्या ऑफिस मध्ये होता. सॉफ्टवेअर इंजिनीअर. दोघांचं खूप चांगलं पटायचं. ५-६ वर्षांची ओळख. त्यामुळे दोघांमध्ये खूप छान बॉण्डिंग होतं. अजून ही आहे. मी म्हटलं "अरे वाह.. मग लग्न का नाही करत त्याच्याशी?" ती म्हणाली "ते शक्य नाही. कारण तो मुसलमान आहे. आईला मी हे सांगितलं कारण बाबांना सांगायची हिम्मत नव्हती. पण आई ने स्पष्ट नकार दिला. समाज काय म्हणेल. आपल्याला वाळीत टाकतील लोक. आणि अजून धाकटी आहेच पाठीवर. स्वत:चा नाही तर निदान बहिणीचा तरी विचार कर. म्हणून मी लग्नाचा विचार सोडला. पण अजून त्याला सोडता येत नाहीये."
एखाद्या हिंदी पिक्चरला साजेशी अशी तिची कहाणी. मी तिला इतकंच म्हटलं, "जो वर तो तुझ्या आयुष्यात आहे तोवर कुठलाच दुसरा मुलगा तुला आवडणार नाही. त्या मुळे पुढे जाऊन कुठलंही पाऊल उचलशील तर विचार पूर्वक उचल. भावनेच्या भरात नाही. दोन भिन्न जातीय कुटुंबात सगळ्यात जास्त तडजोड तुलाच करावी लागेल. त्यामुळे आई वडिलांची काळजी स्वाभाविक आहे. त्यांना विश्वासात घेऊन सगळं कर. आणि पॉझिटिव्ह राहा. सगळं छान होईल"
तेव्हा पासून ती खूप रिलॅक्स झाली. जेव्हा जेव्हा भेटायची मन मोकळं करून जायची. हळू हळू तब्येतही सुधारू लागली. दर महिन्यातून एकदा औषध संपेल तशी आमची भेट व्हायची.
काही दिवसांपूर्वी तिला जिने माझ्या कडे पाठवलं त्या डॉक्टर मैत्रिणीचा फोन आला. "अगं तुझ्या ओळखीत कोणी सायकॅट्रिस्ट आहे का? मीरा चे वडील आले होते माझ्या कडे. त्यांना परवा रात्री छातीत दुखू लागलं. मी सेटल केलं त्यांना पण म्हणाले मीरा चं खूप टेन्शन आलय. तिला वेड लागलय. ती कोणा मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडलीय. एखाद्या चांगल्या डॉक्टर ला दाखवून तिची ट्रीटमेंट करायचं म्हणत होते. मी म्हटलं तुझ्या कानावर घालते कारण तू काउन्सिलिन्ग करतेस ना. तुझ्याच्याने काही होईल का?"
मला तर आश्चर्यच वाटलं. माणसं असाही विचार करतात याचं. प्रेम असं ठरवून कसं काय नष्ट करत येईल. धर्म निरपेक्ष भारताची २१ व्या शतकातली पिढी आंतरधर्मीय विवाहाला वेडसर पणा ठरवून कशी काय मोकळी होते ? धर्माचा फरक ही आपण ठरवू तितकी मोठी आणि छोटी गोष्ट. शेवटी आपण सगळीच हाडामासाची माणसं. मानवनिर्मित या धार्मिक विभाजनात माणूसच जास्त भरडला जातो. माझ्या आणि मैत्रिणीच्या संवादाला एक आठवडाही झाला नसेल तोच काल मीराचा फोन आला. तिचं लग्न ठरलंय.. तेही त्याच्याशीच.. त्याचंच आमंत्रण द्यायला. मला आश्चर्य वाटलं. पण तिच्या धाडसाचं कौतुक ही.
प्रवाहाच्या विरुद्ध जाताना तिला किती दडपण आलं असेल. पण ती हे सगळं आई बाबांना विश्वासात घेऊन करत होती म्हणून तिचं कौतुक. अजूनही बाबा तितकेसे राजी नव्हते. पण आई खम्बिर पणे पाठीशी आहे म्हणाली. तीचं ही बरोबरच आहे. समाज जो मागून पुढून नावंच ठेवणार त्याच्या साठी तिने आपल्या भावनांचा बळी का म्हणून द्यावा? आणि मुलगा शिकला सवरलेला जबाबदार आहे. हिची धर्मांतर न करण्याची अट त्याला मान्य आहे. सगळं कसं जुळून आलय धर्म सोडून. मीराला मी तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तेव्हा मीरा एकच वाक्य म्हणाली, "Doctor, you were the only person who understood me."
तेव्हा खूप पूर्वी वाचलेलं एक वाक्य आठवलं, "Ramzan Has Ram, Diwali Has Ali - Who Are We To Draw The Line?"
I wish this republic day we break the boundaries of religion and set our thoughts free. Wishing everyone..

Tuesday, January 24, 2017

हा छंद जिवाला लावी पिसे !!

आज व्हाॅट्स अप वर एक खूप छान विचार वाचला. "रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो. तसंच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे."
किती सुरेख कल्पना आहे हीे!! आजूबाजूला यंत्रवत वावरणारी माणसं पाहीली की वाटतं, नक्कीच काहीतरी चुकतंय. रोजच सकाळ होते, मग रात्र, मग पुन्हा सकाळ. तेच ते करत जगणं नक्कीच कंटाळवाणं आहे. पण जेव्हा पासून मी ठरवून लिहायला लागलेय तेव्हापासून जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त आणि फक्त काय लिहू याचेच विचार येतात. मला वाटतं, आपल्या रोजच्या आयुष्यात एखादा ध्यास घेऊन आपण जगलो तर बाकी त्रासदायक रूटीन गोष्टी खूपच क्षुल्लक वाटू लागतात.कधी कधी कुणा दुसऱ्याच्या वागण्याने आपल्या आयुष्याला गंज लागतो. अशा वेळी परीसस्पर्श हवा छंदाचा. मग आयुष्याचं सोनं झाल्याखेरीज राहणार नाही.
खूपदा अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ज्याची आपण कल्पनाही केलेली नसते. ज्यांच्यावर विश्वास ठेवावा असेच लोक विश्वासघात करतात, जवळच्या व्यक्तीच परकेपणाने वागू लागतात, केलेल्याची काही लोक जाणीव ठेवत नाहीत आणि आपल्यालाच आपल्या चांगुलपणाची चीड येऊ लागते. अनुभवातून शहाणपण येतं असं म्हणतात. पण मी म्हणेन वाईट अनुभवातूनच अधिक जास्त शिकत जातो आपण.
आपल्या सारखीच प्रत्येक व्यक्ती पारदर्शी कशी असेल. आपल्याला वाटतं नातीे नव्हे मनं जोडतो आपण. व्यवहार, स्वार्थ, हीशोब,अहंकार यांच्याही पलिकडे जाऊन झोकून द्यायचं असतं नात्यात. पण अपेक्षाभंग हे नात्याचं अलिखीत फळ. हळू हळू चांगल्या वाईटाचीही सवय होत जाते. पण त्याची सल काही केल्या मनातून जात नाही. मनावरचा ओरखडा कायमचा होऊन जातो. मग मन त्याच वळणावर घुटमळतं. आपण थांबलो की सगळंच थांबतं. आपली प्रगती, उत्साह,वेग, उत्कर्ष, स्वप्नं.
खरंतर आयुष्यात लिफ्ट सारखं वर जाताना कधी कधी थांबावंही लागतं. निगेटीव्ह गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखवावा लागतो आणि पाॅझिटीव्हीटीला आतला. जसा लिफ्टचा वेग आपल्या हातात नसतो तसा आयुष्याचाही.
चढ उतार हे येणारच. मग उतारावर बघावं सोबत कोण कोण आहे आपल्या. पडत्या काळातही हात देतात ते आपले. चढत्या काळात तर सगळेच असतात सोबत... निदान भासवायला तरी.
कोण सोबत असो अथवा नसो.. छंद आपली आयुष्यंभर साथ देतात. एकटेपणा समृद्ध करतो तो छंद, साऱ्या जगाचा विसर घडवतो तो छंद, कुणी कौतुक करो अथवा न करो पण आपल्याला आपलंच कौतुक करायला भाग पाडतो तो छंद.. चला तर मग. शोध घेऊया आपल्याला नक्की काय आवडतं याचा. म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातही आपला सूर आपल्याला गवसेल. आणि टेन्शन खऱ्या अर्थाने खलास होईल.
मला कविता, लिखाण, गाणं, पाककला खास करून बेकींग, हस्तकला, पेंटींग आणि सातत्याने नाविण्याचा शोध घेण्याचा छंद आहे. मला जाणून घ्यायला आवडेल, तुमचे छंद कुठले आहेत ते. सांगा बघू पटापट...
टीप: कृपया कॅंडी क्रश ला छंद म्हणून नमुद करू नये.

Monday, January 23, 2017

परीझाद...

परवाच परिझाद येऊन गेली. परिझाद म्हणजे मला अजूनही न उमगलेली पेशन्ट. हो.. कारण एक दोन भेटीत आता माणसं नखशिखांत ओळखायची प्रॅक्टिस झालीय. पण ही अजूनही माझ्या साठी कोडंच आहे न उलगडणारं. ती जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आली, सहा महिन्यापूर्वी तेव्हा ही अशीच ... अपॉइंटमेंट न घेता.. मी म्हटलं तिला इथे औषध सुरु करण्यापूर्वी आम्ही हिस्टरी घेतो. ज्या साठी आधी वेळ घेऊन यावं लागतं. पण तीचं म्हणणं होतं की आत्ता औषध द्या. मग मी वेळ काढून येते हिस्टरी द्यायला. ती ऐकेचना. शेवटी पाहिलं तर तिच्या दोन्ही पायांना ७-८ भवऱ्या (corn) होत्या. ज्या साठी तिनं भरपूर औषधं, कापाकापी, कॅप इत्यादी सगळं करून पाहिलं होतं. तसा कॉर्न माझ्या हातचा मळ आहे त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. औषध सुरु करते पण इम्प्रूव्हमेंट जर दिसली नाही तर मात्र हिस्टरी द्यावीच लागेल.
साधारण माहिती गोळा करताना कळलं की ती कतार ला आपल्या नवऱ्या सोबत राहते. मुलाला लहानपणापासून आईकडे इथं मुंबईला सोडलंय. कारण नवऱ्याला तिची जास्त गरज आहे. तिथे कतार ला म्हणे लेबर महाग आहे ना. मग नवऱ्याची वरची कामं करायला कोणी नको का. मला ऐकून जरा कससंच झालं. परिझाद ने सगळं कम्युनिकेशन इंग्रजीतच केलं. ट्राउझर आणि सफेद शर्ट, निसर्गतः च सरळ केस आणि गोऱ्या वर्णाची परिझाद वाटत तर सुशिक्षित च होती. तिचा तो टिपिकल पारसी अॅक्सेंट ऐकून तिची नक्कल करण्याचा मोह होत होता जो मी कसा बसा आवरला. तिच्या म्हणण्याप्रमाणे बाजारहाट, जेवण-खाण, कपडे भांडी लादी सगळं तीच करते. खूप दुखत होते तळवे म्हणून तिथल्या सरकारी रुग्णालयात तिची ट्रीटमेंट नवऱ्याने करून दिली पण त्याचा काही फायदा झाला नाही. इथे मुंबईत स्वस्त असतील उपचार असा विचार करून नवऱ्याने यंदाच्या दौऱ्यात तिला इथला डॉक्टर ट्राय करायची परवानगी दिली होती. आणि हो जर डॉक्टर गॅरंटी देत असेल तरच उपचार सुरु कर असंही सांगितलं होतं.
फक्त प्रॉब्लेम हा होता की ती महिन्याभरासाठीच मुंबईत होती. आणि मग पुढच्या पाच महिन्यासाठी कतार ला निघणार होती. त्यामुळे जे औषध देईन ते एकदाचच. त्यात काही फेरबदल करता येणं शक्य नव्हतं. मी आधी १५ दिवसाचं औषध दिलं. आणि ३०० रूपये झाले असं सांगितलं. तर ही म्हणाली माझ्याकडे आता ५०च रुपये आहेत. मी तुम्हाला थोडे थोडे करून आठवड्याला पैसे देईन. इतकी चांगल्या घरातली बाई आणि फक्त पन्नास रुपये गाठीला घेऊन. आणि त्यात ओळख ना पाळख हिला का म्हणून हा उधारीचा ऑप्शन द्यावा. पण मला काही त्या क्षणी नाही म्हणता आलं नाही म्हणून मी तिची अट कबूल केली. नाही म्हणायला दर आठवड्याला शम्भर दीडशे करत तिने पैसे चुकते केले.
पुढच्या खेपेला आली तेव्हा चार आणे फरक आहे म्हणाली. तितक्यात तिच्या मुलाचा फोन आला. तो कदाचित हिच्याशी भांडत असावा. कारण फोन मधला आवाज स्पष्ट पणे बाहेर मला ऐकू येत होता. ती फक्त हो नाही म्हणत होती. इतक्यात तिचा मुलगाच क्लिनिकच्या केबिन मध्ये शिरला. कटकटीच्या सूरात हिच्या कडून घराची चावी घेऊन बाहेर पडला. हिनं काहीच झालं नाही या आविर्भावात मला विचारल, "औषधाचे किती झाले?" मी हिरीरिने सांगितले, पण पुन्हा तिच्या कडे द्यायला पैसे नव्हतेच. पुन्हा एकदा पानिपतच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या विश्वासाला मी संजीवनी दिली आणि तिला औषध देऊ केलं.
सहा महिन्यापूर्वी शेवटचं आली तेव्हा म्हणाली, "My husband said if your doctor is saying you need to continue medicine for long then maximum I can afford to give you one months time. if that works then Ok or else forget it." आता इतकं कळलं होतं की हिचा नवरा हिटलरचा भाऊ असावा. हुकूमशहाच जणू. मी ठीक आहे म्हणून एक महिन्याचं औषध दिलं. आणि बाकी आशाच सोडून दिली. या वेळेस पैसे वेळेवर मिळाले. तेवढाच काय तो आनंद. ती कतारला परतली.
अधे मध्ये तिचा व्हाट्स अप यायचा. पायाचा फोटो पाठवून ती स्टेटस कळवायची. मीही उत्तर द्यायचे. औषध पुरवून पुरवून वापरायला शिकवायचे. मागच्या आठवड्यात आली तीच थँक्यू म्हणत. "Doctor, you cured me. in our custom the one who cures is God. So i have to give you something in return. i will bring it in the evening." मी म्हटलं तिला हे तर माझं कर्तव्यच होतं. पण ती ऐकेचना. मी येते हा संध्याकाळी असं म्हणून तिने निरोप घेतला. आणि ती काही आलीच नाही. मी तर विसरूनही गेले. पण परवा आली ना ती. खजूर आणि चाॅकलेट्स घेऊन. "Doctor you have to accept it. Please don't say No." मी स्विकारलं. आणि विचारलं, "मग काय. आता किती दिवस मुक्काम भारतात?" तर ती म्हणाली "I don't know. Actually now my son got admission for hotel Management. Daily he has to wear white,clean and well ironed clothes. So he wants me to do the needful. My mother is too old to manage. So I will stay here."
आता मात्र मला परीझाद एक आई किंवा पत्नी न वाटता घड्याळाचा लोलक वाटली. तिचं हे तळ्यात मळ्यात असणं मला काही रूचलं नाही. आजही काही नवरे पूर्ण वेळ गृहीणी असलेल्या स्त्री ला खूपच गृहीत धरतात. आणि मग मुलं ही त्यांचं अनुकरण करतात. अर्थात स्त्री ही त्याला तितकीच जबाबदार आहे. "माझ्या शिवाय ना माझ्या घराचं पान ही हलत नाही" ही भावना जितकी सुखद आहे तितकीच ती तुमच्या आप्तांना परावलंबी बनवण्यास खतपाणी घालणारी आहे.
प्रत्येक स्त्रीचं स्वतःचं असं एक विश्व आहे. ज्यात तिला तिच्या पद्धतीने विचार करण्याचा अधिकार आहे. घरकामाला कधीतरी सुट्टी दिली, एक दिवस बाहेरू जेवण मागवलं किंवा आज कंटाळा आला म्हणून काही केलंच नाही तर दुनिया इकडची तिकडे होत नाही. उलट थोडासा आराम उद्याचा दिवस जोमानं सुरू करायची उमेद देतो.
गृहीणीच्या आयुष्यात ना रविवार असतो ना प्रिविलेज किंवा सिक लीव. तिला ही ब्रेक हवासा असतो. तिच्या असण्याची जाणीव ठेवा. ती आहे म्हणून घराला घरपण आहे. तिला मानानं जगवा.. कारण तिला ही मन आहे, भावना आहेत. फक्त तिच्या आयुष्यात तिची priority 'ती' नाही तर तिचं कुटुंब आहे. दोन कौतुकाचे शब्द ही तिचा दिवस घडवू शकतात. जर तुमच्याही आयुष्यात अशी एखादी परीझाद असेल तर तिला परी सारखं नाही वागवलं तरी चालेल पण निदान माणसासारखं वागवा. :)

Friday, January 20, 2017

"आपला खेळ होतो.. त्यांचा जीव जातो."

आज खरा चर्चेला विषय मिळाला. अचानक रात्री ८:३० च्या सुमारास माझ्या क्लिनिकच्या खाली भल्या ट्रॅफिक मधून वाट काढत एक फायर ब्रिगेड आली. तितक्यात माझ्या समोर बसलेल्या पेशंट ला कुणाचा तरी फोन आला की एम जी रोड वरून गाडी काढू नकोस. फायर ब्रिगेड आल्या मुळे बघ्यांची गर्दी जमलीय. तो पेशन्ट समोरून उठून बाहेर गेला तोच मला माणसांची आरडा ओरड ऐकू आली.. "आने दो .. आने दो ..." पाहते तर अख्खा एम जी रोड सोडून अग्निशमन दलाची गाडी माझ्याच क्लिनिकच्या इमारतीखाली. आता जरा माझी तंतरली पण उत्सुकता सुद्धा ताणली गेली.
रिसेप्शनिस्टला विचारलं तर ती ठाम पणे म्हणाली, "आग लागली वाटतं. म्हणूनच आली असेल गाडी." अरेच्चा.. मग सायरन का बरं नसेल वाजला? अजून एक प्रश्न मनात उभा राहिला. तोच आमचा वॉचमन उर्फ खबरी आला मला सांगायला, "मॅडम वह आपका गाडी जरा आगे लेलो रस्तेसे. वह क्या है की झाडपे कव्वा फसा है पतंग के धागे मे. आदमी फसता तो नही आती यह गाडी इतना जल्दी." चला ss एकदाचं कारण कळलं. थोडी हळहळ वाटली पण जीवाला जरा शांती मिळाली.
खाली गेले तर हा जनसमुदाय. एखादा अॅक्शन सीन चकटफू बघायला मिळणार म्हणून काम धंदा सोडून बायका पोरं वर झाडाला डोळे लावून बसलेली. मी आपली गाडी पुढे लावून आले. फायर ब्रिगेडचे २ जवान शिडी उंचावून जखमी कावळ्यापर्यंत पोहोचायचा असफल प्रयत्न करत होते. पण मी काही पुढलं पहायला थांबले नाही.
माझ्या मनात वेगळंच विचारचक्र सुरू होतं. बिच्चारा कावळा..की बिच्चारे जवान..? भूतदये पर्यंत ठीक आहे. पण समजा झाडावर पोहोचताना जवानाला काही इजा झाली.. तो अपंग झाला.. दगावला.. किंवा त्याची बायका मुलं कायमची पोरकी झाली किंवा त्या क्षणी खरंच एखादी इमर्जन्सी आली तर ही गाडी पुन्हा ट्रॅफिकमधून तिथपर्यंतं पोहोचू शकेल? प्रत्येक वेळी संक्रांती पुरता पक्ष्यांच्या जीवाचा प्रश्न उभा राहतो. नंतर जवानांच्या जीवाचाही राहील.
मग इजा होईल अशा नायलाॅन मांज्याच्या उत्पादनावर बंदी का नाही आणली जात. का आपण दुसऱ्याच्या जीवाची किंमत समजू शकत नाही? का आपण आपल्या चुकीच्या हौसेला मुरड घालू शकत नाही? मला फक्त शाळेतली बेडकाची गोष्ट आठवली आज.. "आपला खेळ होतो.. त्यांचा जीव जातो." इतकंच खरं !

Thursday, January 14, 2016

पतंग

पतंग भिडला आभाळाला.. वेगाला ना पारावार..
तगमग माझी उडवायाची पंख तयाचे नाजूक फार..

बघून त्याला आठवला मज कठपुतळीचा खेळ जुना
घडवू जैसे तैसा घडतो निर्जीवतेचा मेळ पुन्हा..

दोरी त्याची माझ्या हाती ठरवू तितका रंगे खेळ
क्षणात सरते उत्कंठा जो सरणावरती संपे वेळ..

पेटून इर्षेला कापावे अंतर अवघे आकाशी
अडकून पडते अविचाराची दोरी अवघड बुंध्याशी

किती सारथी झालो आपण तरी अडखळे डाव उगा
अपुल्या नकळत अवचित तुटतो कचकन मांज्याचा धागा

वाटेवरचे मूक पाखरू विव्हळते घायाळ किती
मनी म्हणावे आयुष्याची दोरी नियतीच्या हाती..

अशी असावी झाली संकट संग्रामाची संक्रांती
पतंग आपण मांजा नियती घडो विचारांची क्रांती !!

Friday, May 2, 2014

चंद्रकोर..

सांग तुझ्या पाऊलखुणा इतक्या कशा खोल खोल..
पौर्णिमेचा चंद्र पुन्हा इतका कसा गोल गोल..

सरत जाते चंद्रकोर विरत जाते चांदरात.
उरत जातात चांदण्या मिळत जाते पायवाट..
 तुझं पाऊल माझं पाऊल.. पावलोपावली तोल मोल..
माझं प्रेम जास्तं.. की तुझं प्रेम अनमोल..
सांग तुझ्या पाऊलखुणा इतक्या कशा खोल खोल..
पौर्णिमेचा चंद्र पुन्हा इतका कसा गोल गोल..

आकाशातल्या चांदण्या.. मोजून कधी सरतात का..
भरती आणि अहोटीने लाटा कधी विरतात का..
माझ्या लेखी तुझं असणं.. तुझं हसणं.. तुझे बोल..
बाकी सारं नसल्याजोगं.. असून सुद्धा कवडीमोल..
सांग तुझ्या पाऊलखुणा इतक्या कशा खोल खोल..
पौर्णिमेचा चंद्र पुन्हा इतका कसा गोल गोल.. !!

Tuesday, September 4, 2012

"Chehra"


Log Chehre Se Insaan Parakhte Hai.. Par Dil Ke Jazbaat Koi Samzta Nahi..
Yeh Duniya Dikhaave Par Chalti Hai.. Yaha Saccha Kaun?
Koi Parkhta Nahi..

Koi Rang - Rup Se Naakhush Hai.. Koi Kimat Se.. Ehmiyat Se..
Chehre Pe Chadhaye Rang Yahaan… Behkaaye Gujri Niyatse..

Unchaai Kad Ki Dekhe Koi  Rota Hai Ghut Ghut Ke Yaha..
Aur Usi Chaah Se Khele Koi..Khudki Apni Sehte Se..

Ho Chhota Kad Par Badi Muraade.. Sacchi Jiski Kismat Hai..
Chuye Woh Ambar Ki Unchai..Khoon Pasina Mehnatse…

Tarakib Maayne Rakhti Hai.. Taqdeer Yaha To Sabki Hai..
Vishvas Khuda Aur Khud Par Ho To.. Mumkin Hai Sab Himmat Se..

Jo Toke Us Se Keh Denaa- In Najrose Bhi Dekho Jahan..
Khaamiya Bhale Kitni Bhi Ho..Par Jaise Bhi Hum Khush Hai Yahan..

Yeh Ek Chehra Asli Ho.. Baki Ho Nakli Kitne Bhi..
Us Apne Chehre Se Yun Mohobbat Karo Humesha Sada Sabhi ..!!